*कल्याणीच्या कल्याणासाठी धावून आले कर्मयोगी फाऊंडेशन*
*कल्याणीचे राज्यस्तरीय कराटे चॅम्पियन स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न कर्मयोगीने केले पूर्ण*
*कल्याणीला सन्मानित करून ५००१ रुपयांची आर्थिक मदत..*
कर्मयोगी प्रत्येक वेळेस गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करण्यास तत्पर असते. त्याचाच एक भाग म्हणून अत्यंत गरीब परिस्थितीत असलेल्या वडिलांचे छत्र हरवलेल्या, स्वतःचे घर नसलेल्या गुंमगाव ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथील कुमारी कल्याणी केशव कोटरांगे या ताईचा राज्यस्तरीय कराटे चॅम्पियन स्पर्धा २०२२ साठी निवड झालेली आहे. त्यासाठी कल्याणीला औरंगाबाद येथे जायचे आहे. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती.
ही गोष्ट जेव्हा तिने आपल्या आईला सांगितली व यासाठी जवळपास सात हजार रुपये खर्च येणार आहे हे सांगितले तेव्हा तिची शेतमजुरी करणारी आई म्हणाली आपल्याकडे कुठला इतका पैसा, अस कर तू जाऊ नको. हे शब्द एकताच कल्याणी अतिशय दुःखी झाली. कल्याणीने आपल्या अत्यंत गरीब परिस्थितीत म्हणजे, वडील सारखे दारू प्यायचे एक रुपया सुद्धा घरी आणायचे नाही. अशाही परिस्थितीत गुमगावचे प्रतिष्ठित नागरिक आत्माशंकर गुप्ता व त्यांची पत्नी प्रतिमा गुप्ता यांनी कल्याणीचे पालकत्व स्वीकारून संपूर्ण बीकॉम पर्यंतचे शिक्षण केले. कल्याणीच्या मोठ्या बहिणीचे लग्न सुद्धा करून दिले. परंतु अचानक कोरोना काळात दोन्हीही माणसे स्वर्गवासी झाले. त्यामुळे कल्याणीच्या घरच्यांचा आधारच हरवला. याच काळात वडील सुद्धा दारूच्या अति व्यसनामुळे स्वर्गवासी झाले. याही परिस्थितीत कल्याणीने तालुका व जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. या तिच्या नेत्रदीपक यशामुळे तिची औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियन स्पर्धा २०२२ साठी निवड झाली. परंतु पैसे नसल्यामुळें जीवनात आलेली संधी निघून जाईल अशी भीती वाटत असताना तिने गावातील काही लोकांना ही गोष्ट सांगितली तेव्हा तिला गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी तुला कर्मयोगी फाऊंडेशन नक्की मदत करेल हा विश्वास दिला, व कर्मयोगीशी संपर्क साधला. कर्मयोगीने कसलाही विचार न करता दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोज शुक्रवारला गुमगाव येथे जाऊन, गावातील प्रतिष्ठित मंडळींना व कल्याणीला ग्रामपंचायत येथे बोलावून कल्याणीच्या या उपलब्धी बद्दल तिला गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करत तिला औरंगाबादला जाण्यासाठी ५००१ रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी गुमगावचे सामाजिक कार्यकर्ते सुखदेवराव बावणे यांनी कल्याणीला एक हजार रुपये देऊन या कार्यात मोलाची भर घातली. यावेळी कल्याणीने आपले मनोगत व्यक्त करताना डोळ्याच्या वाट आनंदाश्रूने मोकळ्या करत सांगितले की आज माझ्या सर्व आशा संपल्या असताना कर्मयोगी माझ्यासाठी देवदूताप्रमाणे धावत आले आहे. त्याबद्दल कल्याणीने कर्मयोगीचे व गावातील मंडळींचे आभार मानले.
यावेळी गुमगावच्या सरपंच उषाताई बावणे, उपसरपंच नित्यानंद बोंडाणे, ग्रामविकास अधिकारी गजानन माहुलकर, सामाजिक कार्यकर्ते सुखदेवराव बावणे, जावेदभाऊ, राकेश टिकले व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशनच्या मंडळीनी यशस्वी मेहनत घेतली..